Sunday, October 23, 2016



राशींनी निर्देशित होणारे शरीराचे अवयव

कालात्मकस्य च शिरो मुखदेशवक्षौ हृत्कुक्षिभागकटिबस्तिरहस्यदेशाः।
ऊरू च जानुयुगलं परतस्तु जङ्घे पादद्वयं क्रियमुखावयवाः क्रमेण।।8।।

बाराही राशी कालपुरुषाच्या विशिष्ट अवयवांचे निर्देशन करतात. चवथ्या चरणात क्रियमुखावयाः क्रमेण असे म्हटले आहे. मेष राशीची पर्यायी नावे पाहताना आपण क्रिय हा शब्द पाहिला होता. क्रियमुखाः म्हणजे मेष राशीपासून सुरुवात करून क्रमेण – क्रमाने. वरच्या श्लोकात तुम्हाला बारा अवयव सापडतील. ते असे –
1)      शिरः
2)      मुखदेशः
3)      वक्षः
4)      हृद्
5)      कुक्षिभागः
6)      कटिः
7)      बस्तिः
8)      रहस्यदेशः
9)      ऊरू
10)  जानुयुगलम्
11)  जङ्घे
12)  पादद्वयम्
हे क्रमाने मेष ते मीन यांनी निर्देशित होणारे अवयव आहेत. पुढील कोष्टकात सविस्तर माहिती देतो.
क्रमांक
रास
अवयव
1
मेष
डोके
2
वृषभ
तोंड
3
मिथुन
छाती
4
कर्क
हृदय
5
सिंह
पोट
6
कन्या
कंबर
7
तूळ
ओटीपोट
8
वृश्चिक
लिंग
9
धनू
मांड्या
10
मकर
गुडघे
11
कुंभ
पिंढ-या
12
मीन
पाय

Sunday, October 16, 2016

राशींची पर्यायवाचक नावे
राशी एकूण बारा असतात. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
1. मेष
2. वृषभ
3. मिथुन
4. कर्क
5. सिंह
6. कन्या
7. तूळ
8. वृश्चिक
9. धनू
10. मकर
11. कुंभ
12. मीन 

संस्कृत श्लोकांमध्ये राशींबद्दल बोलत असताना वरील नावांखेरीज इतर अनेक समानार्थी शब्दांचा उपयोग केलेला आहे. पुढील सर्व श्लोक समजण्यासाठी ही पर्यायी नावे माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक श्लोकाचा एक विशिष्ट छंद (Meter) असतो, वृत्त असते. त्यात विशिष्ट संख्येनेच अक्षरे वापरण्याचे बंधन असते. शिवाय -हस्व, दीर्घ अक्षरांचेही महत्त्व असते. त्यासाठी आवश्यकतेप्रमाणे कमी-अधिक लांबीचे शब्द चपखलपणे वापरता यावेत, यासाठी पर्यायी शब्द कामाला येतात. पुढील चार श्लोकांमध्ये यांचाच ऊहापोह केलेला आहे.

मेषाजविश्वक्रियतुम्बुराद्या वृषोक्षगोताबुरिगोकुलानि।
द्वन्द्वं नृयुग्मं जुतुमं यमं च युगं तृतीयं मिथुनं वदन्ति ।।4।।

कुलीरकर्काटककर्कटाख्याः कण्ठीरवः सिंहमृगेन्द्रलेयाः।
पाथोनकन्यारमणीतरुण्यस्तौली वणिक् जूकतुलाधटाश्च।।5।।

अल्यष्टमं वृश्चिककौर्पिकीटाः धन्वीधनुश्चापशरासनानि।
मृगो मृगास्यो मकरश्च नक्रः कुम्भो घटस्तोयधराभिधानः।।6।।

मीनान्त्यमत्स्यपृथुरोमझषा वदन्ति, दस्रादिकर्क्षनवपादयुताः क्रियाद्याः।
चक्रस्थिता दिविचरा दिननाथसङ्ख्याः क्षेत्रर्क्षराशिभवनानि भसंज्ञितानि।।7।।

मेष राशीची पर्यायी नावे - मेष, अज, विश्व, क्रिय, तुंबुर, आद्य
मेष म्हणजे मेंढा. म्हणून मेंढ्याला समानार्थी असलेले संस्कृत शब्द यात आलेले दिसतात. ही पहिली रास आहे. म्हणूनच आद्य हा शब्द.

वृषभ - वृष, उक्ष, गो, ताबुरी, गोकुल ('बैल' या अर्थाचे शब्द)

मिथुन - द्वंद्व, नृयुग्म, जुतुम, यम, युग, तृतीय
नृ म्हणजे माणूस, युग्म म्हणजे जोडपे. तिसरी रास असल्याने 'तृतीय' 

कर्क - कुलीर, कर्काटक, कर्कट ('खेकडा' या अर्थाचे शब्द)

सिंह - कण्ठीरव, मृगेन्द्र, लेय ('सिंह' या अर्थाचे शब्द)

कन्या - पाथोन, रमणी, तरुणी ('कन्या' अर्थाचे सर्व शब्द)

तूळ - तौली, वणिक्, जूक, तुला, धट
वणिक् म्हणजे व्यापारी

वृश्चिक - अली, अष्टम, कौर्पी, कीट
वृश्चिक म्हणजे विंचू. याच अर्थाचे सर्व शब्द आहेत. आठवी रास म्हणून 'अष्टम'

धनू -   धन्वी, चाप, शरासन ('धनुष्य' अर्थाचे शब्द)

मकर - मृग, मृगास्य, नक्र
नक्र म्हणजे मगर. या राशीचे स्वरूप 'मगराचे शरीर पण हरिणाचे तोंड' असे आहे. मृगास्य या शब्दात आस्य या शब्दाचा अर्थ तोंड असा होतो.  

कुंभ - घट, तोयधर ('घागर' या अर्थाचे शब्द)
तोयधर म्हणजे पाणी धारण करणारा.

मीन - अन्त्य, मत्स्य, पृथुरोम, झष 
मासा या अर्थाचे सर्व शब्द. शेवटची रास असल्याने 'अन्त्य'

दिविचराः - आकाशात संचार करणारे (राशी व नक्षत्रे) यांना भ, भचक्र, क्षेत्र, ऋक्ष, राशी, भवन अशा संज्ञा आहेत.  

Saturday, October 15, 2016

प्रणम्य वन्दारुजनाभिवन्द्राय, पादारविन्दं रघुनायकस्य।
सङ्गृह्य सारावलिमुख्यतन्त्रम्, करोम्यहम् जातकपारिजातम् ।।


अन्वयः - वन्दारुजनं प्रणम्य, रघुनायकस्य पादारविन्दं अभिवन्द्य, सारावलिमुख्यतन्त्रं सङ्गृृह्य, अहं जातकपारिजातं करोमि।

अर्थ - वंदनीय लोकांना नमस्कार करून, प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणकमलांना वंदन करून, सारावली हा ग्रंथ प्रमाण मानून, मी जातकपारिजात हा ग्रंथ रचतो.


स्पष्टीकरण- हा जातकपारिजातः या ग्रंथातील तिसरा श्लोक आहे. विद्वज्जनांना तसेच देवाला नमस्कार करून वैद्यनाथजी सारावली हा कल्याणवर्मा यांनी लिहिलेला ग्रंथ प्रमाण म्हणून मानल्याचे स्वीकारतात. तरीसुद्धा या ग्रंथातील पुढे येणा-या काही श्लोकांमध्ये व सारावलीतील श्लोकांमध्ये मतभिन्नता आढळते.

आत्तापर्यंतच्या तीन श्लोकांमध्ये ग्रंथ लिहिण्यासाठी जी कर्तव्ये असतात, ती पूर्ण केली आहेत. पुढील श्लोकापासून विषयप्रवेश होत आहे! बारा राशींबद्दल क्रमाने अत्यंत सविस्तर माहिती पुढील लेखापासून चालू होत आहे.

 

Sunday, October 9, 2016




भारद्वाजकुलोद्भवस्य विदुषः श्रीवेङ्कटाद्रेरिह
ज्योतिःशास्त्रविशारदस्य तनयः श्रीवैद्यनाथः सुधीः ।
होरासारसुधारसज्ञविबुधश्रेणीमनः प्रीतये
राशिस्थानिरूपणानि सकलं वक्ष्ये यथानुक्रमम् ।।2।।

भारद्वाजकुलोद्भवस्य - भारद्वाज कुळात जन्मलेल्या, विदुषः - विद्वान् अशा, श्रीेवेङ्कटाद्रेः - श्री वेंकटाद्री यांच्या, इह - येथे, ज्योतिःशास्त्रविशारदस्य तनयः - ज्योतिषशास्त्रात तज्ञ असलेल्यांचा मुलगा, श्रीवैद्यनाथः सुधीः - बुद्धिमान असा श्री वैद्यनाथ (ग्रंथकार), होरासारसुधारसज्ञविबुधश्रेणीमनः - ज्योतिषशास्त्रातील अमृतरस जाणणा-या विद्वानांच्या प्रीतीसाठी, राशिस्थाननिरूपणानि - राशींची स्थाने इत्यादी निरूपणे, सकलं - सगळे, यथानुक्रमं वक्ष्ये - क्रमानुसार सांगतो.

हे ग्रंथकार श्री वैद्यनाथ दीक्षित भारद्वाज कुळातील आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव श्री वेंकटाद्री असे होते. ते सुद्धा ज्योतिषशास्त्राचे तज्ञ होते. ग्रंथकर्त्याने ग्रंथाचे प्रयोजन सांगितले आहे. ज्योतिषशास्त्राचे ज्ञान हे जणू अमृतच! हे अमृत प्राशन करू इच्छिणा-यांसाठी त्यांच्या प्रसन्नतेसाठी राशींची ठिकाणे इत्यादी सर्वकाही क्रमाने सांगतो.

या श्लोकात ग्रंथकाराने स्वतःचा परिचय दिला आहे. स्वतःचे नाव, वडिलांचे नाव व गोत्र, इतकीच माहिती ग्रंथकाराबद्दल या श्लोकातून मिळते.

 तिस-या श्लोकाबद्दल पुढच्या आठवड्यात ....

Saturday, October 1, 2016

जातकपारिजातः
राशिशीलाध्यायः प्रथमः
मङ्गलाचरणम् -
श्रीकान्ताजशिवस्वरूपममरज्योतिर्गणस्वामिनं
मायातीतमशेषजीवजगतामीशं दिनेशं रविम् ।
नत्वा गर्गपराशरादिरचितं सङ्गृह्य होराफलं 
वक्ष्ये जातकपारिजातमखिलज्योतिर्विदां प्रीतये ।।
 जातकपारिजात! जातकांसाठी अक्षरशः पारिजातवृक्षाप्रमाणे असलेला ग्रंथ! यात काय आहे, असं म्हटल्यापेक्षा काय नाही, हे विचारणं चांगलं. ज्योतिषशास्त्रातील हा ग्रंथ मला खरोखरीच सर्वार्थानं परिपूर्ण वाटतो. 18 अध्यायांमध्ये ज्योतिषशास्त्राचं फार विस्तृत व सुंदर वर्णन केलेलं आहे. ग्रंथकार दैवज्ञ श्री वैद्यनाथ यांना वंदन करून मी या ग्रंथावर मला वाटणारे विचार येथे प्रकट करत आहे. 


ग्रंथाचा मंगलाचरणाचा श्लोक किती सुंदर आहे पहा! कोणत्याही ग्रंथांच्या सुरुवातीला, मध्ये, तसेच शेवटी मंगलाचरण लिहावे, ही आपली संस्कृृती. वैद्यनाथांनी या श्लोकात सूर्याला वंदन  केले आहे. श्लोकाचा अन्वय पुढीलप्रमाणे आहे.

श्रीकान्त-अज-शिवस्वरूपम्, अमरज्योतिर्गणस्वामिनम्, मायातीतम्, अशेषजीवजगताम् ईशं, दिनेशं रविम् नत्वा, गर्ग-पराशरादिरचितं होराफलं सङ्गृह्य, अखिलज्योतिर्विदां प्रीतये जातकपारिजातं वक्ष्ये ।

 श्री म्हणजे लक्ष्मी. तिचा कान्त (पती) म्हणजे विष्णू . अज - ज्याचा जन्म होत नाही तो, ब्रह्मदेव. शिव - शंकर. अशा प्रकारे, तिन्ही देवांचे स्वरूप असलेल्या. अमर - देव. ज्योति - आकाशात असलेले ग्रह व नक्षत्रे. त्यांचे गण - समूह. देव व ग्रहनक्षत्रे यांच्या अधिपतीला. मायातीतं - मायेपासून (सांसारिक) दूर असलेल्या. अशेष - संपूर्ण. सगळे जीव आणि हे जग यांचे ईश्वर असलेल्या. दिनेशं - दिवसाच्या अधिपतीला. नत्वा - नमस्कार करून. गर्गपराशरादिरचितं - गर्ग व पराशर इत्यादींनी रचलेल्या. होराफलं सङ्गृह्य - ज्योतिषशास्त्रातील विविध नियमांचा संग्रह करून. अखिलज्योतिर्विदां प्रीतये - सर्व ज्योतिषांच्या प्रीतीसाठी. जातकपारिजातं वक्ष्ये - जातकपारिजात हा ग्रंथ सांगत आहे. 

मुक्त भाषांतर - विष्णू, ब्रह्मदेव, व शंकर या तीनही देवांनी ज्याला वंदन केले आहे अशा, देव, ग्रह व नक्षत्रे यांच्या समूहाच्या अधिपतीला, सांसारिक मायेपासून दूर असलेल्या, सर्वच जीव व हे जग यांच्या ईश्वराला, दिवसाच्या अधिपतीला म्हणजेच सूर्याला वंदन करून, गर्ग, पराशर इत्यादी ऋषींनी लिहिलेल्या ज्योतिषशास्त्रातील नियमांचे एकत्रीकरण करून सर्व ज्योतिषांच्या प्रीतीसाठी मी जातकपारिजात हा ग्रंथ सांगतो.

सूर्य म्हणजे ग्रहांचा राजा. सूर्यनारायणाला नमस्कार करून ग्रंथाची सुरुवात तर झाली. या अध्यायात ग्रंथकाराने सर्व राशींबद्दल अत्यंत सविस्तर लिहिले आहे. फक्त राशींचे वर्णन करण्यासाठी तब्बल 61 श्लोक लिहिले आहेत! पुढच्या श्लोकबद्दल पुढील भागात .... 

तावत् शुभमस्तु।